सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे कारण पुढे करत वणी नगरपरिषद प्रशासनाने सुमारे ५० वर्षांहून अधिक काळापासून उभ्या असलेल्या जुन्या व डेरेदार वृक्षांवर कुऱ्हाड चालवली आहे. या बेकायदेशीर व अविवेकी वृक्षतोडीविरोधात शहरातील नागरिक आणि विरोधी नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत नगरपरिषद प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा जाहीर निषेध नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामात अडथळा ठरत असल्याचा दावा करत प्रशासनाने जुन्या झाडांची सर्रास कत्तल सुरू केली आहे. विशेष म्हणजे, ही झाडे तोडू नयेत यासाठी स्थानिक रहिवासी आणि काही लोकप्रतिनिधींनी सुरुवातीपासूनच तीव्र हरकत घेतली होती. मात्र, जनभावना आणि लोकप्रतिनिधींचा विरोध पूर्णपणे डावलून सत्ताधारी गट व प्रशासनाने ही वृक्षतोड रेटून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
‘विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास खपवून घेणार नाही’
गेल्या अर्धशतकापासून ही झाडे वणीकरांना सावली, प्राणवायू आणि स्वच्छ वातावरण देत होती. केवळ विकासकामांचा देखावा उभा करण्यासाठी शहराचा पर्यावरणीय समतोल बिघडवणे अत्यंत निंदनीय आहे. ही केवळ झाडांची कत्तल नसून सामान्य नागरिकांच्या हक्काचा शुद्ध ऑक्सिजन हिरावून घेण्याचा प्रकार असल्याची संतप्त भावना नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.
दोषींवर कारवाई व वृक्षलागवडीची मागणी…या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून या वृक्षतोडीला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, तोडलेल्या जुन्या वृक्षांच्या बदल्यात शहरात मोठ्या प्रमाणावर नवीन झाडांची लागवड करून त्यांचे योग्य संगोपन करण्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, असा इशाराही देण्यात आला आहे.
यांनी नोंदवला जाहीर निषेध: नगरपरिषद प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात नगरसेवक गटनेते सुधीर थेरे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक अजय धोबे, अनिकेत बदखल, शत्रुघ्न मालेकर, रसूल गुलाब रंगरेज, प्रणाली देवाळकर आणि किरण देरकर यांनी एकत्र येत प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

























