सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींवर रोखठोक प्रहार; जनसामान्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरणारे नेतृत्व: इरशाद खान
खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या वणी परिसरामध्ये वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जड व अवजड वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे. कोळसा, डोलोमाईट आणि चुनखडीच्या वाहतुकीदरम्यान नियम धाब्यावर बसवून होणारी ओव्हरलोडिंग, वाहनांवर ताडपत्री न बांधणे, अनियंत्रित वेगाने धावणारे ट्रक आणि मुख्य रस्त्यांवर होणारे बेकायदेशीर पार्किंग यामुळे अपघातांची मालिका आणि प्रदूषणाचा विळखा कायमचा चर्चेत असतो. अशा गंभीर परिस्थितीत केवळ प्रशासनाकडे निवेदने देऊन शांत न बसता, प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून जनसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी आक्रमक भूमिका घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून इरशाद खान यांची ओळख निर्माण झाली आहे.

मनसेच्या विचारसरणीतून समाजकारण व संघटनात्मक भरारी…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते राजू उंबरकर यांच्या ध्येयधोरणांनी प्रभावित होऊन इरशाद खान यांनी सामाजिक व राजकीय चळवळीत स्वतःला झोकून दिले. पक्षाच्या शाखा स्तरापासून शहराच्या उप-अध्यक्षपदापर्यंत विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी स्थानिक समस्यांवर सातत्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आक्रमक आणि सातत्यपूर्ण जनआंदोलनांची दखल घेत पक्षाने त्यांच्याकडे ‘महाराष्ट्र राज्य वाहतूक सेने’च्या राज्य उपाध्यक्षपदाची महत्त्वाची धुरा सोपवली.
वेकोलि प्रशासन व वाहतूकदारांवर नियमपालनासाठी दबाव…
परिसरातील वेकोलि खाणींमधून होणाऱ्या अनिर्बंध वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या धुळीचे प्रदूषण आणि रस्ते अपघातांचा धोका लक्षात घेऊन त्यांनी वेळोवेळी तीव्र आंदोलने उभारली. वाहतूकदार आणि खाण प्रशासनाने सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, यासाठी त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अवजड वाहतुकीवर काही प्रमाणात शिस्त आणण्यात यश आले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला सर्वोच्च प्राधान्य…
अवजड वाहनांसोबतच शहरात नियमबाह्य व धोकादायक पद्धतीने होणाऱ्या शालेय विद्यार्थी वाहतुकीचा प्रश्नही त्यांनी अत्यंत गांभीर्याने हाताळला. चिमुकल्यांचा जीव धोक्यात घालून होणारी वाहतूक रोखण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला, ज्यामुळे शालेय बस व व्हॅन वाहतुकीमध्ये नियमांचे काटेकोर पालन आणि शिस्तबद्धता प्रस्थापित होण्यास मोठी मदत झाली.
वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव…
राजकारणासोबतच आपल्या मनमिळावू आणि दिलखुलास स्वभावामुळे इरशाद खान यांनी सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जनसेवेची ही धडपड अशीच अविरत सुरू राहो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो, सिटी हब मिडिया वणी तर्फे इरशाद खान यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

























