सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…”मी विसर्जन पाहून लगेच येतो…” असे सांगून घरातून आनंदाने बाहेर पडलेल्या अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरड्याचा अंत इतका हृदयद्रावक होईल, अशी पुसटशी कल्पनाही कुणी केली नव्हती. दुर्गा विसर्जनाच्या गर्दीतून अचानक बेपत्ता झालेल्या चिकू उर्फ चेतन मनोज चांदेकर या बालकाचा मृतदेह गदाजी बोरीलगतच्या नाल्यात आढळून आल्याने संपूर्ण कुंभा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रात्रभर गावकऱ्यांची धावपळ, पोलिसांची शोधमोहीम…
२१ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास चेतन गावात सुरू असलेला दुर्गा विसर्जनाचा सोहळा पाहण्यासाठी घरून निघाला होता. विसर्जनाचा कार्यक्रम संपून रात्र उलटली, तरीही तो परत न आल्याने कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला. त्यांनी तातडीने नातेवाईक व गावकऱ्यांना सोबत घेऊन संपूर्ण गाव, अंधारात बुडालेला शेतशिवार आणि विसर्जन मार्ग पिंजून काढला. रात्रीच्या वेळी बॅटरीच्या प्रकाशात गावकरी आणि मारेगाव पोलिसांचे पथक नाल्याकाठच्या परिसराची कसून पाहणी करत होते. मात्र, रात्रभर शोध घेऊनही त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता.
शेवटी नाल्यात तरंगताना दिसला निष्प्राण देह…
रात्रभराच्या अथक शोध मोहिमेनंतर सकाळी गदाजी बोरीनजीकच्या पाण्याच्या नाल्यात चेतनचा मृतदेह तरंगताना आढळून आला. चेतन सुखरूप घरी येईल या आशेवर असलेल्या आई-वडिलांसमोर त्याचा निष्प्राण देह येताच कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अवघ्या पाचव्या वर्षी काळाने त्याच्यावर असा क्रूर घाला घातल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले.
नेमके काय घडले? गूढ कायम…
विसर्जनाच्या गर्दीतून हा चिमुकला रात्रीच्या अंधारात त्या निर्जन नाल्यापर्यंत कसा पोहोचला? अंधारात पाय घसरून तो पाण्यात पडला की आणखी काही घडले? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार यात घातपाताची शक्यता दिसत नसली, तरी मारेगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

























