सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
दैनिक लोकदूत’चे प्रतिनिधी श्रीकांत किटकुले (वय ६०) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने पत्रकारिता क्षेत्रातून तीव्र हळहळ व्यक्त होत असून एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी त्यांना अचानक छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना उपचारासाठी सुगम रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
श्रीकांत किटकुले हे त्यांच्या मनमिळाऊ स्वभावासाठी, सौहार्दपूर्ण वागणुकीसाठी आणि जनसामान्यांशी असलेल्या घट्ट नाळेसाठी परिचित होते. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची एक वेगळी आणि स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पत्रकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून विविध स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
ज्येष्ठ पत्रकार श्रीकांतजी किटकुले यांच्या आकस्मिक निधनाने पत्रकारिता क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या चरणी चिरंतन स्थान देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या अतीव दुःखातून सावरण्याचे बळ प्रदान करो, हीच प्रार्थना.— सिटी हब मीडिया, वणी…

























