सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
वणी शहराच्या हद्दीलगत असलेल्या प्रगतीनगर भागातील वेकोलि कॉलनीत मध्यरात्री एका सुरक्षा रक्षकाची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोक्यावर प्राणघातक घाव घालून या सुरक्षा रक्षकाचा जीव घेण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत व खळबळ उडाली आहे.
ओमप्रकाश हरी प्रसाद (वय अंदाजे ४६ वर्षे) असे या हत्येत प्राण गमावलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवार आणि रविवारच्या (१ नोव्हेंबर) मध्यरात्री अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी थेट डोक्याला लक्ष्य करून गंभीर वार केले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मध्यरात्री उघडकीस आलेल्या या रक्तरंजित हत्याकांडामुळे वेकोलि कॉलनी आणि प्रगतीनगर परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या हत्येमागील नेमके कारण काय होते आणि हल्लेखोर कोण होते, याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे

























