सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
कोलारपिंपरी परिसरातील प्रगती नगर कॉलनीत वेकोलिच्या सुरक्षा रक्षकाचा खून करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) तत्परतेने शोध घेत अवघ्या २४ तासांच्या आत गजाआड केले आहे. रानडुकरांमुळे झालेल्या अपघाताची तक्रार रात्रीच नोंदवून घेण्याच्या हट्टापायी झालेल्या वादातून ही निर्घृण हत्या घडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, कोलारपिंपरी येथील क्षेत्रीय प्रबंधक कार्यालयात ओमप्रकाश हिरा प्रसाद (वय ४५) हे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. ३१ ऑक्टोबर २०२६ च्या रात्री कार्यालय परिसरात अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जीवघेणे वार करून त्यांची हत्या केली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता.
गोपनीय माहितीवरून आरोपी गजाआड… यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत असताना, घटनेच्या वेळी अंचल मोहन उईके (वय २८, रा. प्रगती नगर कॉलनी, कोलारपिंपरी, वणी) हा घटनास्थळी हजर असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून २ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ च्या सुमारास त्याला ताब्यात घेतले.
तक्रारीवरून घातला वाद अन् घेतला जीव… पोलिसांनी अंचल उईके याच्याकडे सखोल विचारपूस केली असता गुन्ह्याची धक्कादायक पार्श्वभूमी उघड झाली. घटनेच्या रात्री कॉलनी परिसरात रानडुकरांचा कळप अचानक समोर आल्याने आरोपी दुचाकीवरून घसरून पडला होता. या प्रकाराची तक्रार वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यासाठी तो रात्री पावणेअकराच्या सुमारास कार्यालयात पोहोचला. ड्युटीवर तैनात असलेले सुरक्षारक्षक ओमप्रकाश प्रसाद यांनी त्याला तक्रार सकाळी कार्यालयात येऊन देण्यास सांगितले. मात्र, ‘माझी तक्रार आत्ताच्या आत्ताच नोंदवून घ्या,’ असा हट्ट धरत आरोपीने वाद घातला. हा वाद विकोपाला जाऊन त्याने संतापाच्या भरात सुरक्षारक्षक प्रसाद यांच्या डोक्यावर व तोंडावर गंभीर वार करून त्यांना जागीच ठार केले.
पोलीस पथकाची कामगिरी… सदरची धडक कारवाई यवतमाळचे मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (उपविभाग वणी) श्री. सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
स्थानिक गुन्हे शाखा (LCB) अधिकारी व अंमलदार:
पोलीस निरीक्षक: सतिष चवरे
सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि): दत्ता पेंडकर, गजानन राजमलु…
पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि): धनराज हाके, शिवशंकर कायंदे, सागर इंगळे….
पोलीस हवालदार (पोहवा): सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदूरकर, सोहेल मिर्झा, मिथुन जाधव, योगेश डगवार, रुपेश पाली, सुनिल मेश्राम…
पोलीस नाईक (पोना): किशोर आडे, मिलीन्द दरेकर, सचिन मलाये…
पोलीस शिपाई (पोकॉ): महेश वाकोडे, रजनीकांत मडावी, सलमान शेख, दिगांबर पिलावन, पवन ढवळे, आकाश सुर्यवंशी…
चालक सफौ / अंमलदार: नरेश राऊत, जितेन्द्र चौधरी…
सदर गुन्ह्याचा पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.

























