सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जळका फाटा चौफुलीवर कार आणि दुचाकी दरम्यान झालेल्या भीषण अपघातात, वांजरी येथील माजी सरपंच बंडू बन्सी सिडाम (वय ५३) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या पत्नी कविता बंडू सिडाम (वय अंदाजे ४०) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ ते १.३० वाजताच्या सुमारास ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. या अपघातामुळे वांजरी परिसरात प्रचंड शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, वांजरी येथील माजी सरपंच बंडू सिडाम हे पत्नी कविता यांच्यासह आपल्या टीव्हीएस व्हिक्टर दुचाकीने (क्र. एमएच ३२ एएम ४३०५) मारेगावकडे जात होते. दरम्यान, जळका फाटा चौफुलीवर भरधाव वेगात येणाऱ्या किया कारने (क्र. एमएच ३४ सीआर ७५४८) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा आघात इतका भीषण होता की दुचाकीस्वार बंडू सिडाम यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली, तर मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी कविता सिडाम यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच मारेगाव पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली. गंभीर जखमी माजी सरपंच बंडू सिडाम आणि त्यांच्या पत्नीला तातडीने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी कविता सिडाम यांना मृत घोषित केले. बंडू सिडाम यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू आहेत.
मारेगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

























