सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी… शिवारातील जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरवरून डिझेल आणि बॅटरी पळवणाऱ्या दोन सराईत चोरांना जेरबंद करण्यात वणी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला (डीबी पथक) यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३१ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
भांदेवाडा येथील जिओ टॉवरवरून २६ जुलै रोजी डिझेल आणि बॅटरीची चोरी झाल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यावरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान, १६ सप्टेंबर रोजी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रँग्लर/रा Spencer कॉ कॉलरी परिसरातील दोन तरुणांनी हा गुन्हा केला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाली करत अर्शील अकील शेख (वय २५) आणि अयान शादीक शेख (वय २१) या दोघांना संशयावरून ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता, दोघांनीही भांदेवाडा येथील टॉवरवरून चोरी केल्याची स्पष्ट कबुली दिली. चोरलेले डिझेल त्यांनी महामार्गावरील वाहनचालकांना विकल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेली १० हजार रुपये किमतीची बॅटरी, डिझेल विक्रीतून आलेली ११ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक MH 34 J 5791, अंदाजे किंमत १० हजार) असा एकूण ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे आणि वणीचे ठाणेदार भानुदास दिपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साजीद सैय्यद, पोलीस हवालदार गजानन सावसाकडे, पोलीस शिपाई रितेश भोयर, गणेश मेश्राम, मोनेश्वर खंडरे आणि नंदकुमार पुष्पलवार यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
बातमीत एआई इमेज वापरली आहे…

























