सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया वणी…
वणी तालुक्यातील सोमनाळा, निंबाळा, राजूर ते चिखलगाव परिसरातील वाढत्या प्रदूषणामुळे जनजीवन आणि आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाच्या वेळकाढू व दुर्लक्षित कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत, ‘लढा संघटना’ आणि बाधित ग्रामस्थांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या सात दिवसांत संयुक्त बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास येत्या १३ नोव्हेंबर रोजी राजूर रिंग रोडवर तीव्र चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात, ओव्हरलोड वाहनांमुळे रस्ते खड्ड्यात…
परिसरात बेकायदेशीररीत्या सुरू असलेले कोळसा डेपो, कोल वॉशरी, डोलोमाईट उद्योग आणि रेल्वे रॅक पॉईंटमुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. सोमनाळा, निंबाळा, झरपट, राजूर, भांडेवाडा, सोनापूर, बोदाड, पळसोनी, मेघदूत, कळमना आणि चिखलगाव परिसरातील नागरिक श्वसनाचे आजार व इतर आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त आहेत. त्यातच दिवस-रात्र धावणाऱ्या ओव्हरलोड अवजड वाहनांमुळे राजूर रिंग रोडची अक्षरशः चाळणी झाली असून रस्त्याची दुरवस्था अपघातांना निमंत्रण देत आहे.
वारंवार बैठका, पण प्रत्यक्ष कारवाई शून्य…
नागरिकांनी यापूर्वी अनेकदा निवेदने दिली असून उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकारी व डेपोचालकांच्या बैठकाही पार पडल्या. मात्र, ठोस कारवाईऐवजी केवळ बैठकांचा फार्स सुरू असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. प्रशासन जाणूनबुजून टाळाटाळ करत कोळसा व्यावसायिक व उद्योजकांना पाठीशी घालत असल्याचा संतापही नागरिकांनी व्यक्त केला आहे.
प्रमुख मागण्या:
सोमनाळा/निंबाळा ते चिखलगाव चौफुली दरम्यान महामार्गापासून ५०० मीटरच्या परिघातील सर्व अनधिकृत कोल डेपो तत्काळ सील करावेत.
राजूर रिंग रोड परिसरातील कोळसा साठे व डेपो बंद करण्यात यावेत.
रुख्माई कोल वॉशरी, विकास कोल, रॅक पॉईंट आणि डोलोमाईट कारखान्यांसाठी होणारी अनधिकृत ओव्हरलोड वाहतूक पूर्णपणे रोखावी.
कळमना येथील आंदोलनाच्या धर्तीवर, संबंधित कंपन्या व डेपोचालकांच्या खर्चातून राजूर रिंग रोडचे तात्काळ डांबरीकरण/बांधकाम करून द्यावे.
गेल्या १५-२० वर्षांत या उद्योगांकडून पर्यावरण रक्षण आणि आरोग्य शिबिरांबाबत कोणती पावले उचलली, याची सखोल चौकशी करून प्रशासनाने केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल सादर करावा.
या निवेदनावर ‘लढा संघटना’ वणी विधानसभा प्रमुख प्रवीण खानझोडे यांच्यासह ॲड. रूपेश ठाकरे, राहुल क्षीरसागर, मंगेश येटे, पंकज मोरे, राहुल कुत्तरमरे, मनोज ढेंगळे, शिवाजी मोरे, ईमामुल हुसेन, अतुल चांदेकर, भगवान मोहिते, धनंजय भोयर, रोशन गारपेलीवार यांच्यासह बाधित गावातील शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास १३ नोव्हेंबरचा चक्काजाम निर्णायक ठरेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

























