सूनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
मारेगाव तालुक्यातील १७ गावांमध्ये पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारणार; सिमेंट रस्ते, शाळा खोल्या व समाजमंदिरांच्या उभारणीला गती…
तालुक्यातील खेडोपाडी मूलभूत सुविधांचे जाळे अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आमदार संजय देरकर यांनी मोठे पाऊल उचलले असून, तब्बल २ कोटी २२ लाख रुपये निधीतून साकारल्या जाणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या कामांमुळे ग्रामीण भागाचा कायापालट होण्यास मोठी मदत होणार आहे. गावांच्या अंतर्गत सुधारणांवर भर देत या निधीतून सिमेंट काँक्रीटचे रस्ते, सुसज्ज अंगणवाडी इमारती, विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या नवीन वर्गखोल्या, समाजमंदिर तसेच सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी भूमिगत नाल्यांची उभारणी केली जाणार आहे. तालुक्यातील गदाची बोरी, खडकी बुरांडा, गोधनी, मच्छिंद्रा, हिवरा, म्हैसडोका, हिवरी, हिवरी पोळ, रोहपट, किन्हाळा, हटवांजरी, चिंचाळा, कुंभा, वाघदरा, बोरी खुर्द, धामणी आणि भालेवाडी या १७ गावांमध्ये या विकासकामांची प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
“विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत आणि प्रत्येक वाडी-वस्तीवर पोहोचवणे हेच आपले ध्येय आहे. या कामांमुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर होऊन विद्यार्थ्यांनाही शिक्षणासाठी पूरक वातावरण मिळेल,” असा विश्वास आमदार संजय देरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
या भूमिपूजन सोहळ्याला जिल्हाप्रमुख संजय निखाडे, महिला जिल्हाप्रमुख डिमनताई टोंगे, जिल्हा संघटक गणपत लेडांगे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर, तालुकाप्रमुख पुरुषोत्तम बुट्टे यांच्यासह अरविंद ठाकरे, अभय चौधरी, देवा बोबडे, दुमदेव बेलेकर, बद्रुद्दीन काजी, विजय अवताडे, दिवाकर सातपुते, सचिन पचारे, मनोज मते, मधुकर वरटकर आणि गुरुदास घोटेकर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संबंधित गावांतील ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

























