सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जळका फाटा चौफुलीवर बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर २०२६) दुपारी झालेल्या भीषण रस्ते अपघाताने आता अत्यंत दुर्दैवी वळण घेतले आहे. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाल्यानंतर, गंभीर जखमी झालेले वांजरी येथील माजी सरपंच बंडू बन्सी सिडाम (वय ५३) यांचीही मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे. प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली. एकाच दिवसात आई-वडील दोघांचेही निधन झाल्याने त्यांच्या दोन मुलांवरून माता-पित्याचे छत्र हरवले असून, संपूर्ण वांजरी गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वांजरी (ता. वणी, जि. यवतमाळ) येथील माजी सरपंच बंडू सिडाम हे पत्नी कविता बंडू सिडाम (वय अंदाजे ४०) यांच्यासह आपल्या टीव्हीएस व्हिक्टर दुचाकीने (क्र. एमएच ३२ एएम ४३०५) प्रवास करत होते. बुधवारी दुपारी १ ते १.३० वाजताच्या सुमारास त्यांची दुचाकी जळका फाटा चौफुलीवर आली असता, भरधाव वेगात येणाऱ्या किया कंपनीच्या कारने (क्र. एमएच ३४ सीआर ७५४८) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत दुचाकीच्या मागील सीटवर बसलेल्या कविता सिडाम यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार बंडू सिडाम यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत होऊन ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. अपघाताची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांनाही तातडीने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती कविता यांना मृत घोषित केले, तर बंडू सिडाम यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना तात्काळ नागपूर येथे हलवण्यात आले होते.
नागपूर येथे डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच उपचारादरम्यान बंडू सिडाम यांचाही मृत्यू झाला. सिडाम दाम्पत्याच्या अकाली एक्झिटमुळे त्यांच्या दोन मुलांचा आधार हिरावला गेला आहे. गावचे माजी सरपंच आणि त्यांच्या पत्नीच्या अशा दुर्दैवी जाण्याने वांजरी व परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

























