सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी,मारेगाव…
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मारेगाव शहरात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेला नागरिक आणि विद्यार्थ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मारेगाव नगर आणि विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

१५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी शहराच्या मुख्य मार्गावरून ही यात्रा निघाली. हातात तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनी भारत मातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि एकतेचा संदेश या यात्रेतून देण्यात आला. शालेय विद्यार्थी, शिक्षकवृंद, परिषदेचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते.
या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी आणि विद्या निकेतनच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेच्या आवारापासून ते शहरातील रस्त्यांपर्यंत सर्वत्र उत्साही आणि राष्ट्रभक्तीमय वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून वणी येथून नयन क्षीरसागर, आयुषी फुलेवार, सुहानी झुमनाके, प्रणव ओझा, हार्दिक ढवळे हे उपस्थित होते. त्यांच्यासोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मारेगाव नगरचे माजी नगरमंत्री क्षितिज गोवारकर यांच्यासह नगरातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात्रेनंतर छात्रावास वसतिगृहात एका छोटेखानी कार्यक्रमात मारेगाव नगरच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये गीतांजली मुसळे यांच्यावर नगरमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, नवनियुक्त दायित्वधारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
तिरंगा यात्रेला लाभलेला जनतेचा उदंड प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांमध्ये दिसलेला उत्साह यामुळे मारेगावच्या विद्यार्थी चळवळीला नवी ऊर्जा मिळाली असून शहरात देशभक्तीचे वातावरण अधिकच दृढ झाले आहे.

























