सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
जनतेच्या प्रश्नावर नेहमी आक्रमक भूमिका घेणारे माजी जि.प. सदस्य विजय पिदुरकर यांच्या प्रयत्नांमुळे वणी-मोहदा-कृष्णानपूर मार्गावर लालपरी धावली…

परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. गेल्या पाच वर्षांपासून ठप्प असलेली वणी-शिरपूर-आबाई फाटा-वेळाबाई-मोहदा-कृष्णानपूर-तुंड्रा-नेरड-मुकुटबन बससेवा पुन्हा सुरू झाली असून, या यशाचे संपूर्ण श्रेय जनतेसाठी सदैव झटणारे, जनतेच्या मधला नेता म्हणून ओळख असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भाऊ पिदुरकर यांच्या अथक आणि आक्रमक पाठपुराव्याला दिले जात आहे.
प्रशासनाला धारेवर धरले, सातत्याने निवेदने…
बससेवा बंद असल्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. खाजगी वाहनांसाठी जादा पैसे मोजावे लागत होते. हा प्रश्न केवळ वाहतुकीचा नसून ग्रामीण भागाच्या शिक्षणाचा आणि सुरक्षिततेचा आहे, ही भूमिका विजय पिदुरकर यांनी वारंवार मांडली.
वेळाबाई ते मोहदा रस्त्याची दुरवस्था कारण सांगून प्रशासन ही सेवा टाळत होते, मात्र पिदुरकर यांनी स्वस्थ न बसता संबंधित विभागाला वारंवार निवेदने दिली, अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि जनतेच्या रोषाची जाणीव करून दिली. त्यांच्या याच आक्रमक आणि सातत्यपूर्ण लढ्यामुळे अखेर परिवहन विभागाला नमते घ्यावे लागले आणि सन २०२६-२७ च्या शैक्षणिक सत्रापासून ही बस पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
या लढ्यात त्यांना ग्रामपंचायत मोहदाच्या सरपंच सौ. वर्षा राजूरकर, उपसरपंच सचिन रासेकर आणि राहुल मानकर सर यांची मोलाची साथ लाभली.
मोहदा बस स्थानकावर जल्लोष, चालक-वाहकाचा सन्मान…
आज सकाळी ९ वाजता पहिली बस मोहद्यात दाखल होताच ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने बसचे चालक चंदू मेश्राम आणि वाहक सचिन भगत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी नालंदा विद्यालय, वेळाबाईचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने महिला व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. उपस्थित महिला आणि विद्यार्थ्यांनी “आमच्या हक्काची बस आम्हाला मिळवून दिल्याबद्दल विजय भाऊंचे आभार” अशा भावना व्यक्त केल्या.
जनतेच्या कामी, जनतेसाठी झटणारा नेता…
विजय पिदुरकर हे नेहमीच जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. कागदोपत्री निवेदनापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृती करणारे, प्रशासनाला जाब विचारणारे आणि जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे नेतृत्व म्हणून त्यांची परिसरात वेगळी ओळख आहे. मोहदा बससेवा हे त्याच कार्यशैलीचे उत्तम उदाहरण आहे.
ही बससेवा सकाळी ९.०० आणि सायंकाळी ५.०० वाजता नियमित उपलब्ध राहणार असून, सर्व नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

























